- चौकातील पुलाची रुंदी वाढवून परिसर प्रशस्त करण्याची वाहनचालकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १२ फेब्रुवारी २०२४) :- देहुगावमधील परंडवाल चौकात दररोज सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ- नऊच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वेळेत चाकण एमआयडीसी, येलवाडी फाटा मार्ग तसेच एमआयडीसीकडून कैनबे चौक मार्गे येणारी; तसेच परंडवाल चौकातून देहूरोडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते, परिणामी या चौकात वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे; मात्र या वाहतूककोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले आहेत.
देहतील परंडवाल चौक अरुंद आहे; मात्र या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. परंडवाल चौक ते सांगुर्डी फाटा या बायपासवर, परंडवाल चौक ते विठ्ठलनगर या बायपास मार्गावर तर परंडवाल चौक ते सावता माळी मंदिरापर्यंत तसेच परंडवाल चौक ते देहूगाव मुख्य कमानीपर्यंत दररोज सायंकाळी वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडीत अडकल्याने वाहन चालक आणि कामगारवर्ग हैराण होत आहे.
या चौकात वाहतूक सिग्रल बसविण्यात आले आहेत, परंतु वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ते सिग्नल निकामी ठरत आहेत. वाहतूक पोलिस उपस्थित असले तरीदेखील वाहनांच्या सुमारे एक दीड किलो मीटरपर्यंत रांगा लागलेल्या असतात. ही वाहतूक कोंडी सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते.
परंडवाल चौकातील पुलाची रुंदी वाढवावी. चौक परिसर प्रशस्त करण्यात आल्यास वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका शकेल. पिंपरी-चिंचवड पोलिस वाहतूक विभाग, तसेच स्थानिक नगर पंचायत प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांनी त्वरित परंडवाल चौकात नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी वाहन चालक आणि कामगार करू लागले आहेत.
परंडवाल चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वारकरी, भाविक भक्तांना देखील त्रास सहन करावा लागतो. दर महिन्याच्या एकादशीला राज्याच्या कानाकोप-यातून वारकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांनादेखील वाहतूककोंडीचा त्रास नाहक सहन करावा लातो. त्यांना या वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, याची दखल, पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक विभाग आणि स्थानिक, तालुका व जिल्हा प्रशासनाने घ्यावी; तसेच दररोज होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
– हभप प्रशांत महाराज मोरे, श्रीक्षेत्र देहूगाव…