- रस्ते, पाणी पुरवठा, भुयारी गटार, घनकचरा व्यवस्थापनासह इतर कामांसाठी अशी आहे तरतूद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १५ फेब्रुवारी २०२४) :- आगामी २०२४-२०२५ या वर्षासाठी देहु नगरपंचायतीने ४६ कोटी ८४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंगळवारी (दि. १३) झालेल्या देहु नगरपंचायतीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या अंदाजपत्रकात १५ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली. हे या यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय म्हणावे लागेल.
नगराध्यक्षा पूजा दिवटे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, उपनगराध्यक्ष सुधीर काळोखे, गटनेते योगेश परंडवाल, सदस्य योगेश काळोखे, मयुर टिळेकर, प्रदीप परंडवाल, सदस्या पुनम काळोखे, लेखापाल केशव पिनाटे, लेखा परिक्षक धनंजय नाईकवडे, आस्थापना प्रमुख रामदास भांगे व इतर उपस्थित होते.
देहु नगरपंचायत प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात महसुलातून १७ कोटी ५८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये मिळकतकराचे सहा कोटी ६६ लाख रुपये, महसुल अनुदानातून एक कोटी १० लाख रुपये, वापरकर्ता आकार आणि द्रव्यदंड या माध्यमातून आठ कोटी ९ लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे गृहित धरण्यात आले आहे. तसेच सरकारी अनुदानातून भांडवली जमा २९ कोटी २४ लाख रुपये अपेक्षित आहे. भांडवली खर्चासाठी २८ कोटी ४३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात रस्त्यांसाठी पाच कोटी ५० लाख, पाणी पुरवठा व जलवाहिनी टाकण्यासाठो दीड कोटी रुपये, भुयारी गटारासाठी ४ कोटी, इमारत बांधकामासाठी एक कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच शौचालयांसाठी एक कोटी व इतर खर्च असा एकूण २८ कोटी ४३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
महसुली खर्चांसाठी १८ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आस्थापनेचा दोन कोटी ५३ लाख रुपये, प्रशासकीय खर्चासाठी चार कोटी, मालमत्ता दुरुस्ती व परिक्षणासाठी तीन कोटी रुपये, व्यवहार व कार्यक्रम अंमलबजावणीसाठी सहा कोटी ५८ लाख रुपये, महसुली अनुदाने, आणि अर्थसहायासाठी एक कोटी ८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे देहु नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांनी सांगितले.
आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी ४६ कोटी ८४ लाख ७३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. त्यास सदस्यांनी मंजुरी दिली. महसुली आणि भांडवली जमेतून ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे. विविध विकासकामांसाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
– निवेदिता घार्गे, मुख्याधिकारी, देहु नगरपंचायत…















