- चोऱ्यांचे प्रकार वाढले; महापालिकेचा कानाडोळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२४) :- नागरिकांनी आपल्याकडे येऊन समस्या मांडाव्यात, विनवण्या कराव्यात आणि मग काम व्हावे, त्या कामाचे श्रेयही आपल्यालाच मिळावे, अशी बहुतेक नेत्यांची मंशा असते. परंतु काही नेते तर यासाठी हट्टच धरुन बसतात. मला विचारल्याशिवाय कामच करायचे नाही, असा हट्ट बाळगणाऱ्या नेत्यांमुळे रहाटणी येथील सिंहगड कॉलनी व बळीराज कॉलनी परिसरात पथदिवे सुरु करता आले नाहीत. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून येथील रस्ते अंधारात आहेत.
रहाटणी येथील सिंहगड कॉलनी व बळीराज कॉलनी क्रमांक दोनमध्ये पथदिव्यांचे खांब नाहीत, त्यामुळे दिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे परिसरात अंधार पसरला असून चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे येथे पथदिव्यांचे खांब बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रहाटणी परिसरातील विविध रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाची कामे महापालिकेच्या वतीने करण्यात आली. त्यामध्ये सिंहगड व बळीराज कॉलन्यांचेही काँक्रीटीकरण करण्यात आले, त्यावेळी पथदिव्यांचे खांब काढून टाकण्यात आले. याला सुमारे एक ते दीड वर्ष झाले. मात्र, आजपर्यंत या रस्त्यावर पुन्हा खांब बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. तसेच मोबाइल चोरीसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे रहिवासी हतबल झाले आहेत. काही नेत्यांच्या हट्टामुळे हे काम रखडले असून महापालिका अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे बोलले जात आहे.














