- पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांची आरटीओकडून तपासणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२४) :- पंधरा वर्ष पूर्ण होऊनही पर्यावरण कर न भरणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईला सुरूवात केली आहे. हा कर न भरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात तब्बल ५६ लाखांची दंडात्मक कारवाई आरटीओने केली आहे. एकूण २ हजार २०५ वाहनमालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
वाहनाला १५ वर्षे पूर्ण झाल्यास शासनाचा पर्यावरणकर भरणे आवश्यक आहे. अन्यथा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन चालकांकडून कराची रकम वसूल करण्यात येत आहे. त्यासोबतच दंडदेखील आकारण्यात येत आहे. दुचाकी वाहनांसाठी पाच वर्षाकरिता २ हजार रुपये तर चारचाकी (पेट्रोल) ३ हजार रुपये व डिझेल वाहनांसाठी ३ हजार ५०० रुपये तसेच रिक्षासाठी ७५०० रुपये पर्यावरणकर म्हणून आकारला जातो. जुन्या वाहनांचा पर्यावरण कर भरून घेताना त्या वाहनामुळे प्रदूषण होत आहे किंवा नाही याची खात्री करून घेतली जाते. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठीचे निकष ते पूर्ण होत असतील तरच हा कर भरून घेतला जात आहे.
डिसेंबर महिन्यात वाहनांची उपासणी करण्यात आली. यामध्ये काही जणांनी पर्यावरण कर न भरल्याचे आढळले. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. डिसेंबर महिन्यात एकूण २३ हजार ७०० रुपये पर्यावरणकर व दंड २९ हजार रुपये असा सुमारे ५२ हजारांचा कर वसूल करण्यात आला होता. सध्या ही संख्या ५६ लाख १२ हजार रुपयांवर पोचली आहे, तर २ हजार २०५ वाहनांवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड उप प्रादेशिक परिवहन विभागाने दिली.
१५ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांसाठी पर्यावरण कर आकारला जात आहे. या वाहनाद्वारे प्रदुषण होऊ नये असा उद्देश आहे. असा कर न भरणाऱ्यांवर कार्यालयाच्या वतीने कारवाई केली जात आहे.
– अतुल आदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड…


















