न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २० फेब्रुवारी २०२४) :- श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणी नदीच्या पात्रात गेल्या काही दिवसांपासून पाण्यावर जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याच्या तक्रारी वाढल्या असून देहू नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
देहूतील इंद्रायणीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली होती. सिंचनासाठी आणि पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रात जलसंपदा विभागाने पाणी सोडले होते. मात्र इंदोरी, आंद्रा धरण या भागात जलपर्णी असल्याने ती वाहून देहूपर्यंत आली. देहूतील वसंत बंधाऱ्याला जलपर्णी अडल्याने तेथून वैकुंठगमन मंदिराच्या मागील काही भागात व गाथा मंदिराच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे.
याच भागात नदीकाठावर घाट बांधण्यात आला आहे. या घाटावर श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आलेले भाविक इंद्रायणीच्या घाटावर हातपाय धुवून दर्शनासाठी जातात. सकाळी अंघोळ करतात. सध्या नदीपात्रात जलपर्णी असल्याने भाविकांना अंघोळ करता येत नाही किंवा हातपाय धुतानाही अडचणी येत आहेत. तसेच परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. नगरपंचायत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन जलपर्णी काढावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.















