न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२४) :- “महाराष्ट्र रेंजर्स”संस्थेच्या गिर्यारोहकांनी इगतपुरी परिसरातील रतनगडाजवळील ७१० फूट उंचीचा बाण हा अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा महाराष्ट्रातील सर्वोच्च सुळका नुकताच शिवजयंतीचे औचित्य साधत “अल्पाइन स्टाईल” ने यशस्वीरीत्या सर करून महाराजांना साहसी मानवंदना दिली.
बाण हा सुळका अलंग-कुलंग गडाच्या दक्षिणेस, रतनगडाच्या पश्चिमेस, आजोबा पर्वताच्या उत्तरेस आणि डोळखांब गावाच्या पूर्वेस वसलेला आहे. सांधण दरी जवळच नैसर्गिक उभ्या बाणाच्या आकाराचा अभेद्य असा हा सुळका चढाईस अत्यंत कठीण असून आतापर्यंतच्या प्रस्तरारोहण क्षेत्रातील सर्वात उंच म्हणून ओळखला जातो. पाण्याचे असलेले दुर्भिक्ष, मधमाशांची मोठ-मोठी पोळी, अतिदुर्गम भाग आणि अत्यंत खडतर चढाईमार्ग यामुळे बाण सुळका सर करणे हे गिर्यारोहकांसाठी एक मोठे आव्हान असते. आजवर येथे अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीचे औचित्य साधत १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अतीकठीण अशा या बाण सुळक्याच्या चढाईची आखणी महाराष्ट्र रेंजर्स या गिर्यारोहण क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या संस्थेने प्रदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केली. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे या परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. महाराष्ट्र रेंजर्स टीमने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी सांधन दरीलगत असलेल्या साम्रद या गावी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळीच बाण सुळक्याची वाट धरली. निसरडी वाट, घनदाट असलेले जंगल यामुळे हा सुळका अतिशय दुर्गम भागात मोडतो. बेस कॅम्प उभारणी तसेच साहित्याची मांडणी केल्यावर टीमने सुळक्याच्या मार्गाची पाहणी केली. १९ फेब्रुवारी रोजी प्रथम चढाईसाठी गिर्यारोहक तानाजी केकरे व जगदीश पालवे तयार झाले व सकाळी ८ वाजता चढाईस सुरुवात केली. या मोहिमेकरिता प्रगत उपकरणांचा वापर करण्यात आला.
सुळक्याचा मार्ग प्रथमतः क्रॅक व फ्रंट क्लाइंबिंगनंतर ट्रॅव्हर्स करून शेवटचा टप्पा गाठण्यात आला. यापुढील चढाई म्हणजे सरळसोट अंगावर येणारा २०० फूट उंचीचा उभा कडा परंतु चढाईचे घेतलेले तांत्रिक शिक्षण तसेच अनेक सूळक्यांच्या चढाईचा अनुभव यामुळे तो सहजतेने सर करता आला. यानंतर गिर्यारोहक सचिन शिंदे, रामदास ठवळे, अखिल सुळके, अक्षय पाटील यांनीही शेवटच्या टप्प्यापर्यंत चढाई केली. चढाई करताना सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह (SCI) या संस्थेने केलेल्या बोल्टिंगचा खूप उपयोग होत होता, चढाई सुरक्षित होत होती. काही ठिकाणी पिटॉन ठोकून प्लेसमेंट घ्यावी लागत होती. ९ तासाच्या कठीण चढाईनंतर शेवटी टीम सुळक्याच्या माथ्यावर पोचली व घोषणा देत जल्लोष करण्यात आला.
महाराष्ट्र रेंजर्सच्या या गिर्यारोहकांनी आतापर्यंत सह्याद्रीतील अनेक दुर्गम व कठीण श्रेणीतील सुळक्यांवर चढाई केलेली असून हिमालयातील मोहिमाही यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत. या मोहिमेत महाराष्ट्र रेंजर्स संस्थेचे सुनिल येवले, रतनलाल पिंगळे, हरिदास भांगरे, उमेश जगताप इ. गिर्यारोहक सहभागी झाले होते. या कामगिरीबद्दल तानाजी केकरे व महाराष्ट्र रेंजर्स संस्थेवर सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.













