- पिंपरी चिंचवडमधून अजितदादांना दिलेत उपदेशाचे डोस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२४) :- स्वार्थापोटी पक्षांतर करणारे अजित पवार यांचा भाजपात वट आहे, असे वाटत होते. पण आता असं काही दिसत नाही. त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. पूर्वीप्रमाणे त्यांचा वट राहिला नाही. त्यांचा दिल्लीतील संपर्क कमी पडत आहे. विधानसभेला देखील त्यांना वीस जागा मिळतील, किंवा त्यांना भाजपाच्या चिन्हावर लढा, अन्यथा वेगळं लढा, असे सांगितले जाईल, अशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाला दोन्ही पक्षांची गरज आहे. तरीही, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे महत्व कमी केले जात आहे. लोकसभेनंतर त्यांची किंमत काय होईल, हे सांगता येत नाही, असं रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा जेव्हा शहरात येतात तेव्हा त्यांच्या अवती भवती ठेकेदारांचे कोंडाळे असते. ही मलिदा गॅंग दादांना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू देत नाही. आता ही गॅंग भाजपात गेली आहे. अध्यक्ष तुषार कामठे यांच्या विधानावर दादांना प्रतिक्रिया द्यावी लागते, हीच शरद पवार यांची ताकद आहे, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी घणाघाती टीका केली.
महाराष्ट्रातले मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेले, त्यावेळी अजितदादांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट्सचा वापर करुन हे प्रकल्प थांबवायचे होते. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. या निर्णयाला विरोध का केला नाही ?, आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी दिल्लीसमोर तुम्ही जात नाही. यांना सामान्य लोकांच्या प्रश्नांचे काहीही सोयरसुतक नाही, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खरडपट्टी केली.
शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना शहरासाठी जो निधी दिला, त्यातून झालेला विकास पाहून आनंद वाटतो. त्यानंतरच्या काळात निधीअभावी शहराचा विकास झाला नाही, हे पाहून देखील दु:ख वाटतं. नुकताच पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात सामान्य नागरिकांची निराशा झाल्याचे दिसते.अर्थसंकल्प सामान्य नागरिकांसाठी नसून ठेकेदारांसाठी आहे. कारण, पूर्वी निविदा ऑनलाइन सादर केल्या जायच्या. आता मात्र, तेवढी पारदर्शकता त्याठिकाणी दिसत नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
पार्थ पवार याच्या उमेदवारीबाबत काहीही होऊ शकते. लोकसभेला ते उभे राहणार असतील तर शिरुरमध्ये शक्यता कमी आहे. बारामती आणि नगर येथून उमेदवारी मिळू शकते. तसेच, शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी काय केलं हे एका परिवारातील सदस्य म्हणून आम्ही स्वतः पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असं आम्हाला वाटत नाही. तसेच, युगेंद्र पवार हा शरद पवार यांच्या कार्यालयात आज गेला आहे. त्याठिकाणी तो काय बोलतो, त्यावर पुढील वाटचाल ठरेल. तो साहेबांना साथ देत असेल, तर त्याचं स्वागत आहे, असेही ते म्हणाले.
काकी (सुनेत्रा पवार) बारामतीमधून लढणार आहेत, असे बोलले जात असले तरी मला वाटत नाही, तसे अजून ठरले असेल. आत्या (सुप्रिया सुळे) कायमच या मतदार संघातून निवडणूक लढवत आल्या आहेत. असे असले तरी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दोन वेगवेगळ्या भूमिका असतात. याबाबत पवार साहेब जो निर्णय घेतील, तो मान्य करुन पुढील दिशा ठरवली जाईल.
लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. १६ टक्क्यांवरुन १० टक्क्यांवर आरक्षण आणलं आहे. हे आरक्षण टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करु, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी प्रयत्न या शब्दावर खूप भर दिला आहे. प्रयत्न हा शब्द भीतीदायक आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा शब्द घातक आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही, याबाबत शंका आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांनी केला आहे, अशी टिका रोहित यांनी केली.













