- टेकडीवर आढळला मुलाचा मृतदेह; ३१ वर्षीय तरुणाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :-घरासमोर खेळत असलेल्या सलेमान राधेश्याम बरडे (रा. पिंक सिटी सोसायटीसमोर, वाकड) हा साडेआठ वर्षांचा मुलगा शनिवारी (दि. २४) सायंकाळी चारपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह रविवारी (दि. २५) दुपारी बावधन येथील टेकडीवर आढळला. याप्रकरणी पवन जागेश्वरप्रसाद पांडे (वय ३१, रा. वाकड, मूळ उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी मृत मुलाचे वडील राधेश्याम यांनी फिर्याद दिली आहे. बरडे बांधकाम मजूर आहेत. त्यांना चार मुले असून, सलेमान सर्वात लहान होता. तो शनिवारी (दि. २४) सायंकाळी नेहमीप्रमाणे घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. सायंकाळी सहाच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर रात्री आठच्या सुमारास तो नेहमी घरी यायचा. मात्र, शनिवारी रात्री उशिरापर्यंत सलेमान घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी परिसरात त्याचा शोध घेतला. तो कुठेही आढळला नाही. रविवारी (दि. २५) सकाळी राधेश्याम यांनी सलेमान बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली.
दरम्यान, बावधन येथील टेकडीवर लहान मुलाचा मृतदेह आढळल्याचे पोलिसांना समजले. अधिक माहिती घेतली असता, तो मृतदेह सलेमानचा असल्याचे स्पष्ट झाले. अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी पवन याला अटक केली आहे. मात्र, खून कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.











