- ६६ कोटींच्या निधीस अर्थसंकल्पात महायुती सरकारची मंजुरी..
- विभागीय आयुक्तांची “संनियंत्रण अधिकारी” पदी नियुक्ती..
- दोन वर्षात विकासकामे मार्गी लागणार; तेली समाजात आनंदाचे वातावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- राज्याच्या महायुती सरकारने तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधिस्थळ मंदिर विकासासाठी मंगळवारी (दि. २७) रोजी राज्याच्या २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी रु. ६६.१,१८ कोटी रुपयांच्या निधीस अर्थसंकल्पात मान्यता दिली. सरकारने मोठया प्रमाणात निधी मंजूर केल्याने तेली समाजात आनंदाचे वातावरण आहे. तेली समाजातील अनेक सामाजिक संघटनांनी राज्य शासनाचे याबाबत आभार मानले आहेत. तसेच राज्य शासनाने मंजूर केलेला निधी त्वरित विकासकामासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही केली आहे.
दरम्यान श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीचा ‘विकास व सौंदर्यकरण’ या विकास आराखड्याअंतर्गत कामांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांची “संनियंत्रण अधिकारी” पदी नियुक्ती केली आहे. तसेच त्यांना जिल्हाधिकारी, पुणे यांनी केलेल्या सादरीकरणानुसार निश्चित करण्यात आलेली अंमलबजावणी व कार्यान्वयीन यंत्रणांकडून विहित कालमर्यादेत विकासकामे पूर्ण करून घेण्याचे आदेश ” संनियंत्रण अधिकारी” या नात्याने विभागीय आयुक्त, पुणे यांना देण्यात आले आहेत. तसेच त्यांना दोन वर्षात विकासकामे पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे.
“श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ – मार्ग विकास आराखडा अंतर्गत सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधीचा विकास व सौदर्याकरण करणे” या विकास आराखड्याच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील “जिल्हास्तरीय समिती” ने रु.६६.११८ कोटी खर्चाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेस्तव सादर केला होता. उच्चाधिकार समितीच्या दि. १७.११.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती समोर मान्यतेस्तव ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती. दि.२३.११.२०२३ रोजी पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री संत जगनाडे महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या सुदुंबरे आराखड्याच्या प्रस्तावित रू.६६.११८ कोटीच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यावर अर्थसंकल्पात शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान माजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ या वर्षांच्या अर्थसंकल्पात सुदूंबरे येथील समाधीस्थळाच्या विकासासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले होते. आता नव्याने राज्याच्या २०२४-२५ या वर्षांच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सुदूंबरे येथील समाधी स्थळाच्या विकासासाठी ६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात “श्री संत जगनाडे महाराज” यांचे समाधीस्थळ असलेल्या सुदुंबरे या क्षेत्राला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा दिला गेला आहे.
असा आहे मंदिराचा (६६,०१.१८ कोटींचा) विकास आराखडा..
मंदिर आवारात सभा मंडप उभारणी, प्रशासकीय इमारत बांधणे, कांस्य पुतळा आणि दगडी आच्छादन असलेले संग्रहालय, पूजा साहित्य, भक्त निवास, अॅम्पीथेटर, गार्डन, महाव्दार, घाट बांधकाम, गॅस पाईपलाइन, रेन हार्वेस्टींग, सोलर, रॅम्प, फर्निचर, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, विद्युतीकरण, कंपाउंड वॉल, अंतर्गत रस्ते, मैदान, वाहनतळ, पाथवे, लँड स्केपींग, जमिन सर्वेक्षण, बाहयवळण रस्त्याची सुधारणा, पाण्याच्या टाक्या, पाणी साठवण पंप हाउस, बोअरवेल, वातानुकुलीत यंत्र, वाटर कुलर, साउंड सिस्टम, CCTV, अतिरिक्त स्वच्छतागृह, सोलर वाटर सिस्टम.
राज्य शासनाने तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधिस्थळ मंदिर विकासासाठी ६६ कोटींच्या विकास आराखड्याला अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. त्याचा अध्यादेश निघाला आहे. विभागीय आयुक्त, पुणे यांच्यावर देखरेख आणि पाहणी आणि खर्चाच्या नियोजनाची जबाबदारी दिली आहे. आठवडाभरात निविदा प्रसिद्ध होतील. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. – मा. शिवदास उबाळे, अध्यक्ष – श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था…