- राष्ट्रवादी-शिवसेनच्या एकमताअभावी यादीला विलंब; कॉंग्रेसची टीका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२४) :- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ मतदारसंघातील उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली. देशातील १६ राज्यातील उमेदवारांचा या यादीत समावेश होता. मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा या यादीत समावेश नव्हता. त्यावरून काँग्रेसने भाजपावर टीका करण्याची संधी साधली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दोन-दोन की तीन-तीन जागा द्यायच्या हे निश्चित झालेले नाही, त्यामुळे महाराष्ट्राची यादी तयार झालेली नाही. जेव्हा दोन्ही पक्षांच्या चार-चार जागा अंतिम होतील, त्यावेळेस महाराष्ट्रातील यादी जाहीर होईल.
“मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले आहे. हे लपून राहिलेले नाही. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणार आरक्षण दिल आहे, अशी मराठा समाजाची समज झाली आहे. मराठा समाजाचा सर्व रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. मतदानांवर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय घेण्याचा उद्योग सरकारने यापूर्वीही केला आहे. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, निवडणुकीला उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्या आड येतोय, त्याला आडवा करण्यासाठी निवडणुकीत त्याप्रमाणे मतदान करावे. मनातील राग काढण्यासाठी उमेदवार उभे करणे योग्य राहणार नाही”, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. नागपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.















