न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२४) :- शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आयात उमेदवार करण्यापेक्षा भाजपचे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्याची मागणी करत अप्रत्यक्षपणे आढळरावांना विरोध केला. तर, अजित पवारांनाही कोंडीत टाकले. लांडगे लोकसभेत गेले तरच आपला विधानसभेचा मार्ग मोकळा होईल, यासाठीच लांडे यांनी अशी मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आमदार लांडगे यांचीही दिल्लीत जाण्याची तीव्र इच्छा आहे. २०१९ पासून ते तयारी करत असून, युतीमध्ये संधी मिळत नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आयात उमेदवार देऊ नका, भाजपचे आमदार लांडगे यांना उमेदवारी द्यावी. त्यांचे काम करायला मी तयार आहे. भोसरीत मी आणि लांडगे एकत्र आलो तर कुठेही अडचण येणार नाही.
आम्ही एकतर्फी निवडणूक काढू, असा विश्वास व्यक्त करत लांडे यांनी आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. तसेच अशी मागणी करत आमदार लांडगे यांच्याशीही जुळवून घेण्याचे संकेत दिले. दोघेही महायुतीत एकत्र असलेल्या पक्षासोबत आहेत. त्यामुळे आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करूनच लांडे यांनी आमदार लांडगे यांच्यासाठी लोकसभेच्या जागेची मागणी करत जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहराच्या राजकारणात रंगली आहे. लांडे यांच्या या भूमिकेमुळे लांडगे यांच्याशी असलेला राजकीय वादही संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.











