- कोअर कमिटीकडून आ. सातपुते आणि अमित गोरखे यांच्या नावावर खल?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १२ मार्च २०२४) :- सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha) काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंनी, मुलगी प्रणिती शिंदेंसाठी लॉबिंग सुरु केलीय. त्यामुळे सोलापूरमधून प्रणिती शिंदे याच कॉंग्रेसच्या उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर प्रणिती शिंदेंच्या विरोधात तरुण चेहरा म्हणून भाजपचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अमित गोरखे किंवा माळशिरसचे आमदार राम सातपुते या दोन उमेदवारांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या दोघांच्या नावावर भाजपच्या कोअर कमिटीत खल सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, प्रतिस्पर्धी उमेदवार प्रणिती शिंदे या तरुण आहेत. त्यामुळे त्यांच्याच वयाचा उमेदवार भाजपकडून रणांगणात उतरविण्याची तयारी सुरु आहे. अमर साबळे यांना एकवेळ मिळालेली खासदारकी आणि त्यांचे वय पाहता त्यांचे नाव रेसमधून मागे पडले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आ. प्रणिती शिंदे आणि आ. सातपुते हे दोघेही चर्मकार समाजातून आहेत. तर अमित गोरखे हे मातंग समाजातून आहेत. पंढरपूर-सोलापूर मतदारसंघात मातंग समाजाचा मोठा प्रभाव आहे. अमित गोरखे यांना उमेदवारी मिळाल्यास बेरजेचा फायदा नक्कीच भाजपला होऊ शकेल, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून अमित गोरखे यांचे नाव सोलापूर लोकसभा उमेदवारीसाठी अंतिम होऊ शकते, अशी माहिती मिळत आहे.
कोण आहेत अमित गोरखे?…
मूळचे अहमदनगरचे असलेले आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले अमित गोरखे याचं आजोळ सोलापूर असून भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे ते अतिशय जवळचे आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते एमबीए चे उच्च पदवीधर आहेत. २०१९ मध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असताना त्यांना पक्षश्रेष्ठींच्या आग्रहाखातर थांबावे लागले. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या राजकारणात मागासवर्गीय चेहरा असलेले अमित गोरखे यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना गोरखे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्री दर्जा दिला होता. राज्यातील सत्ता गेल्यानंतर त्यांच्याकडे प्रदेश कार्यकारिणीत महत्वाचे असलेले सचिवपद सोपविले होते. पिंपरी विधानसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून देखील गोरखे जबाबदारी पार पाडत आहेत.
राम सातपुते यांचंही नाव चर्चेत…
राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे हेवीवेट राजकारणी उत्तम जानकर यांचा पराभव करून त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. आमदार म्हणून करत असलेल्या कामाची दखल घेत भाजपने त्यांना युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी दिली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राम सातपुते यांची ओळख आहे.















