न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२४) :- अहमदनगर शहराचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यात आले आहे. तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यालचे आता ‘राजगड’ असे करण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्त्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेता आला. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.











