- पिंपरी चिंचवड शहराला वाढीव पाणीपुरवठा मिळण्याची शक्यता मावळली?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२४) :- विरोधातील आंदोलकांची वडगाव न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आंदोलकांत तत्कालीन खासदार दिवंगत गजानन बाबर, तत्कालीन माजी आमदार दिवंगत दिगंबर भेगडे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आदींचा समावेश होता. वडगाव न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. आर. बर्गे यांनी हा निर्णय दि. १२ मार्च रोजी दिला. ९ ऑगस्ट २०११ रोजी हे आंदोलन झाले होते.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार असताना पवना धरणामधून पिंपरी-चिंचवड शहराला बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या कामाला २००९ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी हे काम रोखण्यासाठी भाजप, शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांनी पवनानगर येथे निषेध सभा घेतली. २ ऑगस्ट २०११ रोजी ठाकूरसाई येथून पाणी उचलण्याच्या ठिकाणी जाऊन आंदोलन केले होते. त्यावेळी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आंदोलकांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. वडगाव न्यायालयात २०११ मध्ये दोषारोपपत्र दाखल झाले होते.
आंदोलकांच्या वतीने अॅड. संजय बांदे, शैलेश पडवळ, अविनाश पवार, पवन भंडारी, रसिका खराडे यांनी काम पाहिले, तत्कालीन बाबर, तत्कालीन माजी आमदार भेगडे, माजी राज्यमंत्री भेगडे, शिवसेनेचे मच्छिंद्र खराडे, पवना जलवाहिनीविरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, माउली शिंदे, चंद्रकांत शेटे, भरत मोरे, अनिल ओव्हाळ, तानाजी तोडकर यांच्यासह अन्य आंदोलकांवर दोषारोपपत्र दाखल झाले होते.
मावळ तालुक्यातील नैसर्गिक संसाधनावर पहिला हक्क येथील स्थानिक भूमिपुत्रांचा आहे. बंदिस्त पवना जलवाहिनीला विरोध कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. जोपर्यंत बंदिस्त जलवाहिनी हा विषय कायमस्वरूपी बासनात जात नाही, तोपर्यंत मावळवासीय शांत बसणार नाही, असे रवींद्र भेगडे यांनी सांगितले.
समंजसपणे भूमिका मांडायला गेलेल्या शेतकरी व आंदोलकांचे मत न ऐकता गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल केल्यावर प्रकल्पातील अडथळा दूर होईल असे प्रशासनाचे आणि शासनकत्यांचे मत होते. प्रशासनाला या गुन्ह्यामध्ये सबळ पुरावा देता आला नाही. सबळ पुराव्याअभावी आंदोलकांची निर्दोष मुक्तता झाली. हा शेतकऱ्यांच्या इच्छाशक्तीचा आणि आंदोलकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा विजय आहे.
– मच्छिंद्र खराडे, जिल्हा संघटक, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)











