न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२४) :- महापालिकेची ‘अभय योजना’ किंवा विलंब शास्ती माफीची योजना १ एप्रिल २०२२ पासून कायमस्वरूपी बंद केली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२२ पासून महापालिका मालमत्ता कर विलंब दंडासह वसूल करीत आहे. यापुढील काळात कोणतीही अभय योजना लागू केली जाणार नाही. त्यामुळे थकबाकीदारांना संपूर्ण कर भरावाच लागणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमता कराची चालू मागणी व थकीत कर वसुलीसाठी मोहीम सुरू आहे. त्यामध्ये, थकबाकीदारांसाठी महापालिका अभय योजना लागू करणार आहे का, याबाबत नागरिकांकडून सातत्याने विचारणा होत आहे. मात्र, महापालिकेची अभय योजना किंवा विलंब शास्ती माफीची योजना १ एप्रिल २०२२ पासून कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख २२ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांडून महापालिका कर वसूल करते. यासाठी शहरातील विविध भागात कर संकलानासाठी १७ विभागीय कार्यालये आहेत. कर संकलन विभागाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात १ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. यासाठी कर संकलन विभागाने बढ़ता थकबाकीदाराच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमानपत्रात नावांची यादी छापणे, नळजोड खंडित करणे, स्पीकरद्वारे थकबाकीदारांची नावे जाहीर करणे यासह विविध प्रकारे कर वसुलीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.











