न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२४) :- लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर मतदारसंघांचा समावेश नाही. शिवाय पूर्वी जिंकलेल्या जागा त्या-त्या पक्षांना सोडण्याचे सूत्र लागू झाल्यास शिरूर राष्ट्रवादीच्या तर मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या पदरात पडणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जागांवर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे.
मागील निवडणुकीत मावळमध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, तर शिरूरमधून तीनवेळा खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे उमेदवार होते. दोन्ही मतदारसंघ उमेदवारी मिळण्यापासून मतमोजणीपर्यंत चर्चेत होते. मागील काही दिवसांपासून मावळवर भाजपने दावा सांगितला होता, तर अजित पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे कसे निवडून येतात, तेच पाहतो, असा दम दिला होता. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे चित्र वेगळे असण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मावळसाठी भाजपने मागील दोन वर्षांपासून मशागत सुरु केली होती. तेथून श्रीरंग बारणे हेच उमेदवार असणार, हे स्पष्ट होते. पण, अजित पवार गट महायुतीत आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. शिरूरवर तर स्वतः अजित पवार यांनीच दोन महिन्यांपूर्वीच दावा केला. त्यातच शिवसेनेने मावळसाठी विद्यमान खासदार असलेल्या पक्षालाच जागा सोडण्याची मागणी केली. त्यामुळे शिवसेना मावळवरील दावा सोडणार नाही, हे स्पष्ट होते. येथे शिंदे गटाला दुखावण्यापेक्षा हा मतदारसंघ शिवसेनेला सोडणे भाजपने पसंत केले असावे. दुसरीकडे अजित पवार गट शिरूरमध्ये प्रबळ असल्याने तेथील दावाही भाजपने सोडला असावा.











