न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरूर (दि. २४ एप्रिल २०१९) :- पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे एनडीए सरकारने मंजूर केली असून, यात राज्याचा व केंद्राचा मोठा वाटा आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी साडेसात हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या या कामाचे भूमिपूजन करू, अशी जाहीर घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्रापूर येथे केली.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. सभेला आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे, योगेश टिळेकर, निरंजन डावखरे, शिवसेना नेत्या जयश्री पलांडे दादा पाटील, फराटे धर्मेंद्र, खंडारे अनिल, काशीद भगवानराव शेळके व युतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिरूर मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की ”पुणे – नाशिक, पुणे-नगर रोड यासाठी मोदी सरकारच्या काळातच निधी उपलब्ध झाला. मात्र पूर्वीच्या काँग्रेस सरकारने राज्याच्या कामासाठी एक दमडी दिली नाही. कांद्याचा प्रश्न संसदेत उपस्थित केल्यानंतर जिल्ह्याला २५ कोटी रुपये कांदा अनुदान मिळाले. यावेळची निवडणूक देशाच्या भवितव्याची असून, शेजारील देश ही या निवडणुकीवर लक्ष ठेवून असल्याने मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे”, असे त्यांनी बोलून दाखविली.











