न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांनी प्रचारावर सर्वाधिक खर्च केला आहे. शेवटच्या खर्च पडताळणी दिवसापर्यंत त्यांनी ७ लाख २० हजार ७६० रुपयांचा खर्च दाखविला आहे. पाठोपाठ, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी १ लाख २४ हजार ७५५ रुपयांचा खर्च केला आहे. अपक्षांनी मात्र हात आखडता घेतला असून, त्यांचा खर्च ‘निरंक’ दिसत आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवाराला ७० लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा घातली आहे. अर्ज भरल्यानंतरच्या दिवसापासून उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे सादर करणे सक्तीचे आहे.
बहुजन वंचित आघाडीचे राजाराम पाटील यांनी ५४ हजार ६८४ रुपयांचा खर्च केला आहे. त्यातील सर्वाधिक २५ हजार रुपये रक्कम अनामत रक्कम आहे. इतर खर्च, नाश्ता, जेवण, प्रवास व टोलवर झाला आहे. तर, बहुजन समाज पार्टीचे अॅड. संजय कानडे यांनी एकूण दुसर्या टप्प्याच्या अखेरीपर्यंत केवळ ३२ हजार २२३ रुपये खर्च केला आहे. मावळ लोकसभेच्या रिंगणात एकूण २१ उमेदवार आहेत. त्यातील इतर पक्षाचे उमेदवार व अपक्षांनी अनामत रक्कम व प्रतिज्ञापत्रासाठी केलेला खर्च सर्वाधिक दिसत आहे.















