- थेरगावमधील दुर्दैवी घटना; आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- आठ वर्षाच्या मुलीचा खून करून वडिलांनीही आत्महत्या केली. ही घटना गुरूनानकनगर, थेरगाव येथे मंगळवारी (दि. १९) पहाटे उघडकीस आली. हा प्रकार आर्थिक विवंचनेतून झाला असल्याचे म्हटले जात आहे.
नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ८) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तर तिचे वडिल भाऊसाहेब भानुदार बेदरे (वय ४५) यांनी आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब यांची पत्नी काही कारणानिमित्त गावी गेली होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास तिने आपले पती भाऊसाहेब यांना फोन करून आपल्याला नेण्यासाठी या, असे सांगितले. मात्र भाऊसाहेब हे आलेच नाहीत. त्यामुळे त्या स्वतः घरी आल्या. दरवाजा वाजविल्यानंतर त्यांच्या १४ वर्षाच्या मुलाने दरवाजा उघडला. त्यावेळी त्याच्या आईने वडिल कोठे आहेत. मला ते न्यायला का आले नाहीत, याबाबत विचारणा केली. मात्र वडिल घरात असल्याचे मुलाने सांगितले. त्यानंतर भाऊसाहेब यांच्या पत्नीने घरातील त्यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर तिने मुलीच्या डोक्यावरील चादर उघडून पाहिली असता तिचा खून केल्याचे दिसून आले. ही घटना पाहताच भाऊसाहेब यांच्या पत्नीने हंबरडा फोडला.
उपस्थित नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. भाऊसाहेब हे बांधकामाचे छोट्या स्वरूपाचे कंत्राट घेतात. आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.














