न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- भाजपचे मावळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यानंतर आता उमेदवारी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत मावळच्या उमेदवारीचा तिढा वाढतच असल्याचे दिसते.
महायुतीत मावळची जागा भाजपलाच मिळावी. शहराध्यक्ष जगताप यांना उमेदवारी द्यावी. शहराध्यक्ष म्हणून जगताप करत असलेले कार्य याचा विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल. शिवाय महायुती तसेच भाजपला विशेष फायदा होईल, अशा मागणीचे निवेदन भाजप शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
सन २०१४ च्या निवडणुकीत शंकर यांचे बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून निवडणूक लढविली होती. याचाही फायदा पक्षाला तसेच महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी काळभोर यांनी केली आहे. त्यामुळे आता उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये भाजपच्या आणखी एका नेत्याचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना आयत्या वेळी उमेदवारी मिळेल की महायुतीमधील तिढा वाढतच जाणार, यातून नेमका कसा मार्ग काढला जातो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.













