- आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर होणार कायदेशीर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- देहूगाव येथे जगतगुरु श्री. संत तुकाराम महाराज बीज सोहळा सालाबादप्रमाणे दिनांक २७/०३/२०२४ रोजी संपन्न होणार आहे. दरवर्षी संपत्र होणा-या तुकाराम बीज सोहळाकरीता दोन ते तीन लाख भाविक संपूर्ण महाराष्ट्र व परराज्यातुन देहूगाव येथे दर्शनसाठी घेत असतात.
तसेच जगतगुरु श्री. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहूगांव येथे लाखो भाविक मंदिर व मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकवटलेले असतात. बीज सोहळ्या दरम्यान संत तुकाराम महाराज मंदिर व मंदिर परिसरात फळे-फुले विक्रेते, खेळणी विक्रेते व इतर लोक आपली हातगाडी लावून तसेच फिरुन व जागा अडवून विक्री करत असतात, त्यामुळे बीज सोहळ्या करिता आलेल्या भाविक (वारकरी) यांना अडचळा निर्माण होतो.
गर्दीचा फायदा घेवून गुन्हेगार प्रवृतीचे लोक देखील आपला हेतु साध्य करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवुन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात फुल, फळ, खेळणी विक्रेते हे हातगाड्या लावुन जमीनीवर बसुन तसेच फिरुन त्यांचा माल विक्री करतात. रस्त्याचे दोन्ही बाजुला त्यांच्या बसण्यामुळे रस्त्याची रुंदी लहान होवुन रस्त्यावरुन पायी जाणा-या भाविक यांना पथारीवाल्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होवुन चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान देहगाव येथील श्री. संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर परिसर, देहूगाव मुख्य कमान ते १४ टाळकरी कमान या रस्त्यावर तसेच मुख्य मंदिर समोरील रस्ता ते १४ टाळकरी कमान ते वैकुंठ मंदिर रोड, भैरवनाथ चौक या परिसरात (दि. २६ ते दि. २७) रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव फेरीवाले, पधारीवाले, पानटप-या यांना बसण्यास व फिरण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत.
त्या ठिकाणी सर्व संबंधितांना आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.













