न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- संजोग वाघेरे यांनी प्रचार सुरू केला असला, तरी त्यांच्या प्रचारात महाविकास आघाडी दिसत नाही. आमदार सचिन अहिर यांनी मित्रपक्षांची समन्वय बैठक घेतल्यानंतरही प्रचारात आघाडीचे कार्यकर्ते दिसत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात अद्यापही सक्रिय झाले नसल्याचे दिसते. दुसरीकडे वाघेरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील जुन्या सहकाऱ्यांची मदत होताना दिसत आहे.
दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीचा तिढा वाढला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना इच्छुकांची गर्दी वाढली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हेदेखील उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही असल्याने महायुतीमध्ये तेढ निर्माण झाला आहे.
या मतदारसंघावर मागील तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. एकदा दिवंगत खासदार गजानन बाबर आणि सलग दोन वेळा श्रीरंग बारणे खासदार आहेत. आता शिवसेना दुभंगली असल्याने शिवसेनेच्या जागेवर महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.