न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी ११ मजली इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचे वसतिगृह असणार आहे. तसेच, आयसीयु वॉर्डसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे (मेस्को) १७ सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.
वायसीएम रुग्णालयात ११ मजली इमारत तयार झाली आहे. इमारतीच्या आठव्या, नवव्या व दहाव्या मजल्यावर पदव्युत्तर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह असणार आहे. तसेच, रुग्णालयातील आयसीयू वॉर्ड क्रमांक १,२ व ३ येथे असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी कमी करण्यासाठी तीन पाळीमध्ये अतिरिक्त सुरक्षारक्षकांची आवश्यकता असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे. त्यानुसार सुरक्षा विभागाने मेस्कोचे अतिरिक्त १७ सुरक्षारक्षकांची आंतररुग्ण विभाग या ठिकाणी नियुक्ती केली आहे.
ही नेमणूक २ वर्षांसाठी आहे. एका सुरक्षारक्षकास दरमहा ३१ हजार ४५१ रूपये वेतन आहे. त्यानुसार १७ सुरक्षारक्षकांचे एका महिन्याचे वेतन ५ लाख ३४ हजार ६६७ रूपये होते. दोन वर्षांसाठी १ कोटी २८ लाख ३२ हजार रूपये खर्च आहे. या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.