न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २६ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप व आरपीआय महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडी येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार (दि. २५) रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खा. बारणे, सेनेचे नेते संजय राऊत, मंत्री विजय शिवतारे, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आ. नीलम गो-हे, बाळा भेगडे, अॅड. गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते
उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, ”तब्बल ५० ते ६० वर्षे काँग्रेसमधील दरोडेखोरांनी देश व राज्य लुटण्याचे काम केले. त्या टोळीत सामील असलेले दरोडेखोर शरद पवारांना घरी बसविण्याची वेळ आली आहे, असे नमूद करत, मावळात गोळीबार करणारे सरकार हवे की छत्रपतींचे मावळे, असा सवालही त्यांनी केला. बारामतीचे हजारो लोक मावळात आल्याची चर्चा आहे. त्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही. त्यांची मस्ती लोकसभा निवडणुकीतही जिरविणार आहोत. पवारांना केवळ पाडापाडीचे कारस्थान जमते. मुलगा, मुलगी, पुतण्याला लादणारे शरद पवार यांनी आता घरी बसून त्यांच्याशी खेळावे, अशी टीका त्यांनी केली.
भाजपवर टीका करून, पुन्हा युती केल्याबद्दल लाज नाही का वाटत? या पवार यांच्या टीकेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम कायम ठेवणारे, देशद्रोही कलम रद्द करणार म्हणणारे राहुल गांधीसोबत शरद पवार आहेत. बांगलादेशी, कलाकाराला प्रचारात आणणाच्या ममता बनर्जीसोबत ते आहेत. देश ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. तुम्ही देशाची आणि क्रांतिवीरांचा सन्मान करू शकत नाही. मग, तुम्हाला लाज कशी वाटत नाही. मावळ मतदारसंघातील दादागिरी सहन करणार नाही. खा. सुप्रिया सुळेंनी मत नाही तर, पाणी नाही, असा दम दिला होता. दुष्काळात धरणात पाणी नसल्याबद्दल अजित पवारांनी अभद्र वक्तत्व केले होते. अशांना आता घरीच बसवा”, असे आवाहनही त्यांनी केले.











