- धोकादायक स्पीड ब्रेकरवरुन गाडी स्लीप झाली अनं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२४) :- देहूरोड येथील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकामुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. या मार्गावरून श्री क्षेत्र देहूसह चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्क, जुना मुंबई-पुणे महामार्ग, द्रुतगती मार्ग, पिंपरी-चिंचवड, पुणे आदी ठिकाणी वाहन जात असतात. त्यामुळे, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यात दुचाकी, चारचाकी यासह मोठ्या वाहनांचाही समावेश असतो.
येथील गतिरोधकांची संख्या कमी करण्यासह नियमाप्रमाणे उभारण्याची मागणी होत आहे. मात्र, देहूरोड बोर्ड प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. अशातच शनिवारी (दि. २३) रोजी तरुणाचा गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अपघात होऊन मृत्यू झाला आहे. तो देहुरोडकडुन येलवाडीकडे जात होता.
हा अपघात (दि. २३) रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ऑर्डनन्स हाउस, चिंचोली येथील रस्त्यावर घडला. त्याची स्कुटी स्पीड ब्रेकरवरुन स्लीप झाली. त्यामुळे रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होवुन त्यातच त्याचा मृत्यू झाला. अनिकेत अरुण घोडके (वय ३१ वर्षे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात १६४/२०२४ भा.दं.वि कलम २७९,३३७,३३८,३०४ (अ), मो. वा. कायदा क. १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहवा ठोकळे तपास करीत आहेत.