न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२४) :- बांधकाम व्यवसायकांना लाखो रुपयांचा गंडा घालुन सुमारे ३ वर्षापासून राहण्याची जागा बदलुन पोलीसांना गुंगारा देणा-या आरोपीस पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा, युनिट १ च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. उंड्री पिसोळी, कात्रज बायपास, पुणे येथे कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
साइमन रॉनी पीटर (वय ४० वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. तो बांधकाम व्यवसायिकाकडे सेल्स मॅनेजर म्हणुन नोकरी करायचा व ग्राहकाकडुन रोख स्वरुपात आलेली लाखो रुपये रक्कम घेवुन पसार होत होता. आरोपी साइमन रॉनी पीटर हा सुमारे ३ वर्षापासुन पिंपरी चिंचवड व पुणे शहर परिसरातील बांधकाम व्यवसायिकांना लाखो रुपयांना गंडा घालुन राहण्याची जागा बदलुन राहत होता.
आरोपी साइमन रॉनी पीटरवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे माहिती मिळाली आहे. तसेच त्याने हिंजवडी, हडपसर, वनलिका प्रोजेक्ट पिरंगुट, पुणे या परिसरात गुन्हे केल्याचे तपासात प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.