- विनापरवाना खोदकाम केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विविध विभाग तसेच, खासगी व सरकारी यंत्रणांनी रस्ते खोदकाम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावे. मे महिन्यात शहरात अत्यावश्यक कामे वगळता कोणत्याही खोदकामाला परवानगी दिली जाणार नाही. या काळात खोदकाम केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात रस्त्याची होणारी दुरवस्था लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेचे स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज तसेच, स्मार्ट सिटी कंपनी, नेटवर्किंगच्या खासगी कंपन्या, एमएनजीएल व इतर सरकारी संस्था विविध सेवावाहिन्या आणि केबल टाकण्यासाठी रस्ते व पदपथ खोदतात. खोदकाम करून भूमिगत सेवाहिनी टाकली जाते. खोदकामानंतर व्यवस्थित दुरूस्ती न केल्याने पावसाळ्यात खड्डे पडतात. तसेच, पावसाच्या तोंडावर खोदकाम केल्याने रस्ते खराब होऊन खड्ड्याचे प्रमाण वाढते.
विविध सेवा वाहिन्यांच्या कामासाठी वारंवार केले जाणारे खोदकाम आणि त्यानंतर केल्या जाणार्या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरूस्तीमुळे शहरातून वाहने चालविणे अवघड होते. त्यामुळे लहान-मोठे अपघात होतात. ते टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते आणि अतिवर्दळीच्या रस्त्यांवरील जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन, पावसाळी गटारे, इंटरनेट व अन्य केबल, एमएनजीएल तसेच, वीज वाहिन्यांची कामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावीत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर खोदकामास परवानगी दिली जाणार नाही.
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोणत्याही कामासाठी रस्ते व पदपथ खोदकामास परवानगी दिली जाणार नाही. केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कामांना अटी व नियम टाकून परवानगी दिली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात कोणालाही रस्ते व पदपथ खोदाईस परवानगी दिली जाणार नाही. विनापरवाना खोदकाम केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच, फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या महिन्यात मोरवाडी भागात विनापरवाना रस्ते खोदल्याने संबंधित ठेकेदारावर पोलिसांकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











