न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०१९) :- कै. अण्णासाहेब मगर यांची आज शुक्रवार (दि. २६) रोजी १०० वी जयंती होती. त्यांच्या जयंतीचा चक्क महापालिकेला विसर पडला आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ”पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पिंपरी, चिंचवड, भोसरी व आकुर्डी हे चार गावं एकत्र करुन, कै अण्णासाहेब मगर यांनी नगरपालिका स्थापन करत या शहराची मुर्हतमेढ रोवली. त्यानंतर सन १९८२ रोजी त्यांनी महानगरपालिकेची स्थापना केली. महानगरपालिका झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विकास झाला. आज या शहराची ओळख सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून देशात ओळखले जाते. हे सर्व कै. आण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीने विचारामुळे शक्य झाले.
आज शुक्रवार (दिनांक २६ / ०४ / २०१९) रोजी कै. अण्णासाहेब मगर यांची १०० वी जयंती आहे. महानगरपालिकेमार्फत सर्वच महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. मात्र, ज्या अण्णासाहेब मगरांनी या शहराची मुहूर्तमेढ रोवली, त्यांचीच १०० वी जयंती सत्ताधारी भाजप व प्रशासन कसे काय विसरले? कै. आण्णासाहेब मगरांच्या १०० व्या जयंती निमित्ताने खरे तर विविध सामाजिक, प्रबोधनात्मक चार पाच दिवस कार्यक्रम ठेवले पाहिजे होते. परंतु, सत्ताधारी भाजप व प्रशासनाने साधे मुख्यालयात अण्णासाहेबांच्या पुतळ्याची स्वच्छता केली नाही, की साधा हार घातला नाही. ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे. ज्यांच्या दूरदृष्टीमुळे हे शहर उदयास आले. त्यांच्यामुळे तुम्ही आज महापालिकेत विविध पदे भोगत आहात. त्यांनाच तुम्ही विसरले. ही बाब भाजपा सारख्या शिस्तबध्द व संस्कृतीचे रक्षक म्हणविणा-या पदासाठी लांछनास्पद आहे.
याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्त व जनसंपर्क अधिकारी यांना फोन करुन विचारले असता, आपणास माहिती नाही, असे बेजबाबदार उत्तर दिले. याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरीकांच्या वतीने सत्ताधारी भाजप व प्रशासनाचा जाहीर निषेध करतो, असे या पत्रात म्हटले आहे.











