न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची आज शनिवार (दि. २७) रोजी सायंकाळी सहा वाजता सांगता होणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाद्वारे रॅली काढण्याचे नियोजन केले आहे.
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि. २९ ) रोजी मतदान होणार आहे. आचारसंहितेनुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार आज शनिवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार थांबवावा लागणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण प्रभागात उद्या रॅली काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची चिंचवड येथे दुपारी साडेतीन वाजता सांगता सभा होणार आहे.
तर, महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण प्रभागात दुचाकी रॅली काढून प्रचाराची सांगता केली जाणार आहे.











