न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम मशिन येत्या आठवड्याभरात संबंधित विधानसभेच्या स्ट्रांग रूममध्ये दाखल होतील. त्यानंतर तीन दिवस त्या ईव्हीएमची बांधणी व जोडणी केली जाणार आहे. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमोर हे कामकाज केले जाणार आहे.
मावळ लोकसभेतील पनवेल, उरण, कर्जत, मावळ, चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मतदान केंद्रप्रमुख व त्यांच्या सहाय्यकांना मतदान केंद्र हाताळणीचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुसरे प्रशिक्षण लवकरच देण्यात येणार आहे.
पुण्यातील कोरगाव पार्क येथील फूड कॉर्पोशन ऑफ इंडियाच्या गोदामात पुणे जिल्ह्यातील सर्व ईव्हीएम मशिन ठेवण्यात आले आहेत. ते मशिन १ मे रोजी संबंधित विधानसभा मतदार संघाच्या स्ट्राँग रूममध्ये आणण्यात येणार आहेत. त्यानंतर २ ते ४ मे असे तीन दिवस त्या ईव्हीएमची जोडणी व बांधणी केली जाणार आहे. त्यावेळी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या समोर ईव्हीएम आणि बॅलेटपेपर मशिनची जोडणी व बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता असणार आहे. चिंचवड विधानसभेचे स्ट्रॉग रूम थेरगाव येथील शंकर अण्णा गावडे भवन येथे आहे. तर, पिंपरी विधानसभेचे स्ट्रॉग रूम चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आहे.
पनवेलसाठी ५३८, कर्जतसाठी ३३९, उरणसाठी ३४०, मावळसाठी ३९०, चिंचवडसाठी ५४९ आणि पिंपरीसाठी ४०० ईव्हीएम मशिन लागणार आहेत. मतदार संख्या वाढल्याने काही मतदारसंघात साहाय्यकारी मतदार केंद्र असणार आहेत. त्या केंद्रासाठी ईव्हीएम असणार आहे; तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघास राखीव ईव्हीएम असतात. मावळ लोकसभेसाठी ईव्हीएमची संख्या २ हजार ७०० पेक्षा अधिक असणार आहे.