- बॅटरींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२४) :- शहरात सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी महापालिकेने सीसीटीव्ही सर्वेलन्स प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पाच हजारांपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे विविध भागात बसविण्यात येत आहेत. त्यातील बहुतांश कॅमेरे कार्यान्वित झाले असून, काही कार्यान्वित व्हायचे आहेत. मोठ्या रस्त्यांवरील चौकांसह वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी स्पीड नियंत्रण फलकांसह कॅमेरे बसविले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन गुन्ह्यांचा उकल करण्यास अशा कॅमेऱ्यांची पोलिसांना मदत झाली आहे.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे करसंकलन विभागाच्या स्थानिक कार्यालयांत जोडले आहेत. असे सतरा कार्यालये शहरात आहेत. या कार्यालयांतून निगडी येथील कमांड कंट्रोल सेंटरला (सीसीसी) हे कॅमेरे जोडले आहेत. या सीसी सेंटरमध्ये एक पोलिस अधिकारी व तीन कर्मचारी २४ तास नियुक्तीस आहेत. वाहतूक पोलिसांकडून याच कॅमेऱ्यांचा वापर करून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत.
एका मोटारचालकाने सीटबेल्ट लावलेला नव्हता. प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर चौकातील (भेळ चौक) सिग्नलवर थांबलेला असताना वाहनांच्या क्रमांकासह चालकाचे छायाचित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे घेतले होते. तो वाहनचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात (मोरवाडी चौक) येईपर्यंत दोन हजार रुपये दंड आकारल्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर छायाचित्रासह प्राप्त झाला होता.
स्मार्ट सिटीअंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जात आहे. काही कॅमेरे बंद असून काही सुरू आहेत. त्यांच्याही बॅटरी चोरीला जात असल्याने ते बंद पडत आहेत. सीसीटीव्हींमुळे गुन्ह्यांचा उकल होण्यास पोलिसांना मदत झाली आहे. मात्र, बंद कॅमेरे व बॅटरी चोरीमुळे तपासात अडथळे ठरत आहेत. सुरू असलेल्या कॅमेऱ्यामुळे वाहनांची काच फोडणारा व एका प्रकरणातील चोरटा हाती लागला आहे. म्हणजेच घटना घडल्यानंतर तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग तपासले जाते. एका चौकांत मिळणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर प्रत्येकी किमान दोन अशा पद्धतीने साधारण आठ क्वचित ठिकाणी १० कॅमेरे बसविलेले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी बसवलेल्या बॅटरी चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, अशा प्रकारामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याने बॅटरींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कॅमेरे व बॅटरीचे काम ठेकेदारामार्फत केले जात असून, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारीही त्यांचीच आहे.
‘‘महापालिकेमार्फत सीसीटीव्ही सर्वेलेन्स प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे. त्याचे काम दोन टप्प्यात सुरू असून, ३४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्पीड डिटेक्शन सिस्टीम, रेड लाइट व्होयोलेशन सिस्टिम आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टिम विविध ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यांच्या सर्व्हर रूम इन्फ्रास्ट्रक्चर आणि चार वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीचाही समावेश आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका..