न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरूर (दि. २७ एप्रिल २०१९) :- लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी धडाका लावला आहे. विजयासाठी सर्वच जण जिवाचे रानं करत आहेत. यातच भर म्हणून की काय? आता मराठी अभिनेते सुबोध भावेही राजकीय मैदानात उतरले आहेत. ते शिरुर मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी मंचर येथे आज शनिवारी सभा घेणार आहेत.
२९ एप्रिल रोजी शेवटच्या आणि चौथ्या टप्यातील मतदान होणार आहे. त्यात शिरुर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे मैदानात आहेत. आता सुबोध भावे आढळराव पाटलांचा प्रचार करणार म्हणजे ते अभिनेते डॉ. अमोल कोल्हे विरोधात मैदानात उतरणार आहेत.
सुबोध भावे गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलेच खल झाले होते. राहुल गांधी यांनी पुण्यातील भारती विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सुबोध भावे आणि आरजे मलिष्का या दोघांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली होती. विशेष बाब म्हणजे सुबोध भावे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे डॉ. कोल्हेंचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. तर सलग १५ वर्षे खासदार असलेल्या आढळराव पाटील यांचा राजकारणातील अनुभव दांडगा आहे. त्यामुळे शिरुरची लढत रंगतदार होणार आहे. त्यातच आता सुबोध भावे डॉ. कोल्हे यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याने ही लढत आणखीनच रंगतदार होणार आहे.











