न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २७ एप्रिल २०१९) :- गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर व परिसरातील शहरात ४० अंशांच्या पुढे नोंदविले जात आहे. हे तापमान उत्तर भारतातून शहरात येणारे अति कोरडे वारे, मध्य प्रदेश व गुजरात या उत्तर-पश्चिम दिशेकडून येणारे उष्ण वारे, बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कमी झालेले बाष्पाचे प्रमाण आदी कारणांमुळे राज्यासह शहरात सध्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
शहरातील पर्यावरणाचा झालेला र्हास, जागतिक तापमान वाढीचा परिणाम तसेच बेसुमार सिमेंट बांधकामे आदी गोष्टींमुळेदेखील ऐन एप्रिलमध्येच पुण्यात उष्णतेचा कहर अनुभवण्यास मिळत असल्याचेही या तज्ज्ञांनी नमूद केले. दरम्यान, शहरात एप्रिल महिन्यातील गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी झाली. गेल्या पाच वर्षांत शहरातील कमाल तापमानाने ४१ अंशांचा टप्पा केवळ एकदाच ओलांडला होता.
३० एप्रिल २०१३ रोजी शहरात ४१.३ अंशांची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी (दि. २४) पारा ४१.१ अंशांवर नोंदविला गेला. ३० एप्रिल २००९ रोजी ४१.७ अंश सेल्सिअस व १७ एप्रिल २०१० रोजी ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले होते. पुढील २-३ दिवस शहरातील कमाल तापमान ४१ अंशांच्या घरात राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.











