न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज शनिवार (दि. २७) रोजी सायंकाळी ६.०० वा. थंडावणार आहेत. आज अखेरच्या दिवशी वाहन रॅली काढून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून शक्तिप्रदर्शनाचे नियोजन प्रमुख उमेदवारांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्चला लागू झाली. मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी ( दि. २९) रोजी मतदान होत आहे . निवडणूक आचारसंहितेनुसार मतदानाची वेळ संपेपर्यंत ४८ तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार आज शनिवारी सायंकाळी सहाला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
तसेच मतदारसंघात लावण्यात आलेले होर्डिंग, पोस्टर, झंडे काढून घ्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर प्रचारासाठी तयार केलेले रथही काढून घ्यावे लागतील. या काळात जाहीरपणे पूर्ण प्रचार करण्यास बंदी असते. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना- भाजप- आरपीआय महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार, बहुजन समाज पार्टीचे अँड. संजय कानडे, बहुजन वंचित आघाडीचे राजाराम पाटील हे प्रमुख उमेदवार आहेत. तर, रिंगणात एकूण २१ उमेदवार आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार आहेत. ३० मार्चपर्यंत केलेल्या नोंदणीनुसार एकूण ६२ हजार ६२ मतदारांची भर पडली आहे. चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक २६ हजार ९७ मतदारांची वाढ झाली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात ६ हजार १७५ व मावळ विधानसभा मतदारसंघात ५ हजार ५४५ मतदार वाढले आहेत. पनवेल, उरण व कर्जत हे विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात आहे











