न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- महावितरणाचा भोंगळ कारभार नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. याचा प्रत्यय पिंपरीतील गांधीनगर वसाहतीमधील नागरिकांना नुकताच आला. महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे दोन दिवसांपूर्वी या परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अनेक अर्ज विनंत्या करूनही, महावितरणाच्या प्रशासनाने याची दाखल घेतली नाही तसेच विद्युत पुरवठाही पूर्ववत केला नाही.
त्यात सध्या कडक उन्हाळा. तापमानाचा पार ४१ डिग्रीच्या वर. अशा अवस्थेत शेवटचा पर्याय म्हणून वसाहतीतील तरुण मंडळी एकत्र आली. महावितरणच्या ठेकेदारांची वाट न पाहता श्रमदान करून, १० फूट लांब व ४ फूट खोल, २ फुट रुंद खड्डा खणून वीजपुरवठा पूर्ववत केला. महावितरणाच्या कारभाराचा फटका सहन करूनही वसाहतीतील नागरिकांनी व तरुणांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता श्रमदानाच्या माध्यमातून महावितरणाला ‘तुमच्या बरोबर, अन्यथा तुमच्याशिवाय’ या कृतीतून सज्जड इशाराच दिला आहे. महावितरणानेसुद्धा आपल्या ग्राहकांना जपले पाहिजे. त्याकरीता तशा स्वरूपाच्या कामाचे नियोजन करावयास हवे. अन्यथा भविष्यात ग्राहक मिळणे दुरापास्त होईल. जशी अवस्था आज बीएसएनएलची झाली आहे.
यावेळी वसाहतीतील राम गवारे, विशाल पवळ, निलेश खरात, हनुमंत लोंढे, हनुमंत म्हेत्रे, निलेश लोंढे, अमोल बेंद्रे, हरीश हेंद्रे, अनिल भालशंकर, सुभाष वाघमारे, रंजित सरोदे, कासीम शेख, राजन गुंजाळ तसेच वसाहतीतील जेष्ठ नागरीकसुद्धा तरुणांचा उत्साह वाढविण्यासाठी यावेळी उपस्थित होते, अशी माहिती सचिन गुंजाळ यांनी दिली.











