- पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, पनवेल, उरण-कर्जत मतदारसंघात ‘ईव्हीएम’ पोहोच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सहा विधानसभानिहाय मतदारसंघासाठी आवश्यक ईव्हीएम (मतदान यंत्रे) तयार करण्यात आली आहेत. हे ईव्हीएम बुधवारी (दि. १७) संबंधित विधानसभा मतदारसंघांच्या स्ट्राँग रूमध्ये कुलूपबंद करून सील करण्यात आले आहे. त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्यांसह २४ तास पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
मावळ लोकसभेसाठी मतदानप्रक्रिया १३ मे रोजी पार पाडणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघानुसार मतदान यंत्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील गोदामातून ईव्हीएम मशिन पिंपरी, चिंचवड, मावळ तसेच, भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक कार्यालयाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांसाठी लागणारे कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट तसेच, राखीव संख्येनुसार ही यंत्रे देण्यात आली आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्ट्राँग रूम थेरगाव येथील शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे रवाना करण्यात आल्या आहेत. तेथे सर्व ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट जमा झाले आहेत. एकूण कंट्रोल युनिट ७७९, बॅलेट युनिट ७७९ व व्हीव्हीपॅट ८३९ असे २ हजार ३९७ मतदान यंत्रे स्ट्राँग रूमध्ये सील बंद करण्यात आले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे स्ट्रॉग रूम सेक्टर क्रमांक २६, निगडी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हॉल येथे करण्यात आले आहे. तेथे एकूण कंट्रोल युनिट ५६८, बॅलेट युनिट ५६८ व व्हीव्हीपॅट ६०८ ठेवण्यात आले आहेत. मावळ विधानसभेचे स्ट्रांग रूम तळेगाव दाभाडे येथील नूतन आंभियांत्रिकी महाविद्यालय येथे आहे. त्या स्ट्रॉग रूममध्ये एकूण कंट्रोल युनिट ५५३, बॅलेट युनिट ५५३ आणि व्हीव्हीपॅट ५९२ यंत्रे आहेत. ती मोठी सुरक्षा तैनात करून ठेवण्यात आली आहेत.
मतदान यंत्रे स्ट्राँग रूममध्ये ठेवून ते कुलूप लावून ते सील बंद करण्यात आले आहे. त्या ठिकाणी २४ तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉग रूममध्येही ईव्हीएम दाखल झाले आहेत. त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभेसाठी स्ट्राँग रूम चिखली येथील घरकुल येथे करण्यात आले आहेत. तेथेही मतदार यंत्रे जमा झाली आहेत. दरम्यान, उमेदवार निश्चित झाल्यानंतर तसे बॅलेटपेपर तयार करून मतदान यंत्रे तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३ ते ६ मे हे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर बॅलेट युनिटची जुळणी केली जाणार आहे.
स्ट्राँग रूमभोवती पोलिसांचा खडा पहारा
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील गोदामातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ५४९ मतदान केंद्रांसाठी एकूण २ हजार ३९७ मतदान यंत्रे बुधवारी थेरगाव येथील शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथील स्ट्राँग रूममध्ये आणण्यात आली आहेत. त्याठिकाणी सुरक्षेविषयक सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. पुरेसा पोलिस बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला आहे, अशी माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक विठ्ठल जोशी यांनी दिली.