न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२४) :- आग लागून एक हॉटेल, एक गॅरेज आणि एक दुकान खाक झाले. यात मोठ्या प्रमाणात साहित्य जळून ३० लाखांचे नुकसान झाले. रावेत येथे आदित्य विवाज हाउसिंग सोसायटीसमोर एस. बी. पाटील रस्त्यावर बुधवारी (दि. १८) पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
रावेत येथे एस. बी. पाटील रस्त्यावरील दुकानांना आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
साई सावली फ्रेश मार्ट या दुकानातील किराणा, भाजी, फ्रूट, इन्व्हर्टर, सीसीटीव्ही, फर्निचर, इलेक्ट्रिक वायर्स आगीत खाक झाले. यात १३ लाखांपर्यंतचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सुरेखा हॉटेलमधील किराणा, फर्निचर, इलेक्ट्रिक वायर्स, कपडे, दोन फ्रीज, धान्य, वॉशिंग मशीन, ओवन मशीन, खुर्ची, टेबल व इतर सर्व साहित्य, दोन गॅस सिलिंडर आगीत खाक होऊन १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्नीशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
ओमसाई ऑटो गॅरेजमधील सहा दुचाकी, गॅरेजचे फर्निचर, स्पेअर्स पार्ट इत्यादी आगीत खाक होऊन सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रथमदर्शी शॉर्टसर्किट होऊन आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात येत आहे. आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.