न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२४) :- नाणे ग्रामपंचायतीच्या बिलासंदर्भात चर्चा सुरू असताना दर्जेदार काम न झाल्याने आम्ही बिलाचा चेक काढणार नाही, असे उपसरपंच अजय वंजारी यांनी सांगितले. यामुळे संतापलेल्या ठेकेदाराने उपसरपंचावर कोयत्याने वार केले.
अजय दामु वंजारी (वय २८) असे हल्ल्यात जखमी झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. मारुती शेटे (रा. नाणे, ता. मावळ) यांच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
१२ एप्रिल रोजी फिर्यादी यांना आरोपीने फोन करून घरी बोलावले. तिथे ग्रामपंचायत बिलासंदर्भात चर्चा झाली. त्यावेळी फिर्यादी वंजारी यांनी काम दर्जेदार झाले नसल्याचे सांगून त्या कामाचा धनादेश काढणार नाही, असे सांगितले. त्यामुळे आरोपी मारुती शेटे याने शिवीगाळ करीत झटापट केली. त्यानंतर त्याने कोयत्याने वंजारी यांच्या डोक्यावर वार केले. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे मावळ तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. पुढील तपास कामशेत पोलीस करत आहे.