न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- शिवसेना व भाजप यांच्यातील बेबनाव संपून ते लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. दोघेही मित्र पक्ष लोकसभा निवडणुकीत विनाअट एकत्र दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजप या दोघांच्या एकत्रित येण्यामुळे पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या आशा पल्लवित झालेल्या दिसतात.
येत्या ९ मे रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूका होणार आहे. ४ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सर्वच प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व असल्यामुळे त्या ठिकाणी भाजपच्याच नगरसेवकांची वर्णी लागणार आहे.
परंतू, युती झाल्यामुळे आठपैकी एक तरी प्रभाग समितीचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. शहर भाजपने प्रभाग अध्यक्ष, विषय समित्यांमधील सत्तेचा वाटा शिवसेना नगरसेवकांना दिला तर, प्रभाग अध्यक्ष, विषय समित्यांमधील भाजपची संख्या घटणार हे निश्चित. त्यामुळे शहर भाजपचे पदाधिकारी युती ही केवळ लोकसभेपुरतीच ठेवतात की, शिवसेनेला सत्तेत सामवून घेतात हे पाहणे रंजकच ठरणार.










