न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०१९) :- जवळपास मागील दीड एक महिन्यापासून सुरू असलेल्या मावळ व शिरूर लोकसभा प्रचाराच्या तोफा आज पूर्णतः थंडावल्या. सुरू असलेला प्रचाराचा धडाका, कॉर्नर सभा, रोड शो आणि शक्तीप्रदर्शनाने परिसर दणाणून गेला होता. येत्या सोमवार (दि. २९) रोजी लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मावळ व शिरूरमध्ये मतदान होणार आहे.
मावळमधून महायुतीचे उमेदवार खा. श्रीरंग बारणे व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार तर, शिरूरमधून महायुतीचे उमेदवार खा. शिवाजीराव आढळराव पाटील तर, महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचे भवितव्य अखेरच्या टप्प्यात सीलबंद होणार आहे.
मावळ व शिरूरमध्ये महाआघाडीच्या प्रचारात शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, सक्षणा सलगर, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील या स्टार प्रचारकांसह बीड, उस्मानाबाद मधील आमदारांनी देखील सभा घेतल्या.
मावळ व शिरूरमध्ये महायुतीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, अनंत गीते, रामदास आठवले, आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, नितीन बानगुडे, आदेश बांदेकर, पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील नऊ ते दहा मंत्र्यांनी सभा घेतल्या. वंचित विकास आघाडीकडूनही प्रकाश आंबेडकर आणि असासुद्दीन ओवेसी यांनीही एक प्रचारसभा घेतली.
अखेरच्या टप्प्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झंझावाती सभांनी भाजप व शिवसेनेला हादरून सोडले आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेनेनेही ताकदीने प्रत्युत्तर देत प्रचारात रंगत निर्माण केली. आघाडीच्या प्रचाराला एका अर्थाने राज यांनीच हातभार लावून चांगलीच रंगत निर्माण केली. मोदींच्या प्रत्येक टीकेला तितक्याच ताकदीने उत्तर देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चांगलीच राळ उडवून दिली. पार्थ यांच्या प्रचारात खरखुरी आघाडी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच सांभाळली.











