न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२४) :- मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा हक बजावण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक इतर १२ पुरावे निवडणूक आयोगाकडून ग्राह्य धरण्यात आले आहेत. त्यातील एखादा पुरावा दाखवून मतदारांना मतदानाचा हक बजावता येणार आहे.
मतदान केंद्रावर छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करुन मतदारांना मतदान करता येईल. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ पुरावे निश्चित केले आहे.
यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे…
पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, कंपन्यांनी आपल्या कर्मवाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागात छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे ओळख पटविण्यासाठी आवश्यक असणार आहे.











