न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २९ एप्रिल २०१९) :- मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवार (दि. २९) रोजी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. मावळ मतदारसंघात एकूण ५९.४९ टक्के तर शिरूर लोकसभा मतदारसंघात ५९.४६ टक्के मतदान झाले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ या तीन विधानसभा मतदारसंघांचा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघांचा तर शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार तर शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात खरी लढत आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे तर शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात खरी लढाई होणार आहे.
गतवर्षी मावळ लोकसभा मतदारसंघात ६०.५४ टक्के मतदान झाले होते. तर शिरूर मतदारसंघात ५९.७७ टक्के मतदान झाले होते. निवडणूक आयोग, विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांनी मतदार जनजागृती करुनही, बऱ्याचशा मतदारांनी आपला मतदानाचा हक्कच बजावला नाही. कडक उन्हामुळे की, राजकीय पक्षांचा जाहीरनामा त्या नागरिकांना भावला नाही? याचा फैसला येत्या २३ मे रोजीच पहावयास मिळेल.
मावळ मतदानाची सविस्तर टक्केवारी खालीलप्रमाणे :-
पनवेल ५५.३३ टक्के
कर्जत ६७.७६ टक्के
उरण ६७.२१ टक्के
मावळ ६२.६० टक्के
चिंचवड ५६.२९ टक्के
पिंपरी ५४.४६ टक्के
शिरूर मतदानाची सविस्तर टक्केवारी खालीलप्रमाणे :-
जुन्नर ६४.९० टक्के
आंबेगाव ७०.२९ टक्के
खेड ६२.७६ टक्के
शिरूर ६१.५२ टक्के
भोसरी ५७.४८ टक्के
हडपसर ४७.८४ टक्के


















