न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २९ एप्रिल २०१९) :- कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यासीन भटकळ याला पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणात त्याच्यावर न्यायालयात आरोप निश्चिती करण्यात आली. तर याप्रकरणाची पुढील सुनावणी १५ जूनला करण्यात येणार आहे. त्याला सुरक्षेच्या कारणास्तव तिहार जेलमधून व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येणार आहे.
मोहम्मद अहमद सिद्दीबप्पा उर्फ यासिन भटकळ (वय ३६,रा. भटकळ, उत्तर कर्नाटक) हा कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीमध्ये १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या बॉम्बस्फोटात १७ जण ठार तर ५७ जण जखमी झाले होते. त्याला २०१३ साली नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.
गेल्या दीड वर्षापासून य़ा खटल्यात त्याला पुण्यातील न्यायायलयात हजर करण्यात आले नव्हते. त्यानंतर त्याला आज सकाळी विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले. यावेळी त्याला त्याच्यावरील आरोपांबाबत म्हणणे विचारण्यात आले. तेव्हा मी निर्दोष असून माझ्यावरील आरोप निराधार आहेत. असे त्याने सांगितले.
यासीन भटकळ याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुढील सुनावणीला हजर करण्याला त्याच्या वकीलांनी विरोध केला आहे. ते पुढील सुनावणीवेळी याविरोधात अर्ज सादर करणार आहेत.


















