न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २९ एप्रिल २०१९) :- मावळ मतदारसंघामध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याची लेखी तक्रार एका महिलेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. या महिलेने मतदान केंद्रावर नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून बळजबरीने शिवसेनेला मतदान करण्यास सांगण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
हा प्रकार मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड परिसरात घडला आहे. याप्रकरणी हुमरा पठाण यांनी लेखी तक्रार केली आहे. पठाण या जयवंत भोईर प्राथमिक शाळेत मतदानासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मतदान केंद्रातील अधिकारी निकाळजे हे मतदारांना शिवसेनेला मत देण्यास सांगत असल्याची तक्रार पठाण यांनी केली आहे. त्यामुळे हा अचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत हुमरा पठाण यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्या लढत होत आहे.


















