न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सेवा रस्त्याच्या कामाला सुरवात केली जाणार आहे. यासाठी ताथवडे, पुनावळे, रावेत येथील मुख्य रस्त्यालगतच्या १२ मीटर जागेचे भूसंपादन होणार असून त्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने नगरविकास विभागाला भूसंपादन करण्याबाबत प्रस्ताव दिला असून, त्याची संयुक्त मोजणी होणार आहे. नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर त्यानंतर जागा ताब्यात घेण्याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे.
नगरविकास विभागाकडे नव्याने तीन ठिकाणच्या भूसंपादनाचे प्रस्ताव महापालिकेने दाखल केले आहे. ताथवडे येथील प्रस्ताव १० मे २०२२ रोजी सादर करण्यात आला आहे. पुनावळे येथील प्रस्ताव २० एप्रिल २०२३ रोजी तर रावेत येथील प्रस्ताव १३ जून २०२३ रोजी महापालिकेने सादर केला आहे. या तीनही ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूचे १२ मीटर भूसंपादन केले जाणार आहे. नगर विकास विभागाकडून जिल्हाधिकार्यांना प्रस्ताव पाठविला आहे. त्यांनी पुढील कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार नगर विकास विभागाने मुळशी येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे मोजणीबाबत कळविले आहे. संबंधित शासनाच्या विभागाकडून संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
सध्या महापालिका अंतर्गत ताथवडे, पुनावळे, रावेत या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. मोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. वाढल्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीच्या समस्या होऊ नयेत, यासाठी प्रशस्त रस्ते देखील केले जात आहेत. यासाठी ताथवडे, रावेत आणि पुनावळे भागात सेवा रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरू केली आहे.

















