- मेट्रोच्या दोन्ही मार्गावर शंभर रुपयात दिवसभर करा अमर्याद प्रवास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२४) :- पिंपरी चिंचवडहून पुण्याला व पुण्याहून पिंपरी चिंचवडला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या मेट्रोचाही प्रवाशांना फायदा होत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने आता दैनंदिन पासची सुविधा सुरु केली आहे. प्रवाशांना मेट्रोच्या दोन्ही मार्गावर शंभर रुपयात दिवसभर अमर्याद प्रवास करता येणार आहे.
पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गावर मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातून पहिल्या टप्प्यात कासारवाडीपर्यंत आणि त्यानंतर सिव्हील कोर्टपर्यंत सुविधा झाली आहे. त्याचा लाभ प्रवाशांना होत आहे. पिंपरी- चिंचवड शहरातून पुणे स्टेशन, येरवडा, वनाजपर्यंत प्रवास करता येतो. मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होत असल्याने मेट्रोने प्रवास करणान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मार्च महिन्यात २२ लाखांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. तर, मेट्रो प्रशासनाने नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. मेट्रो प्रशासनाने ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच अॅप, स्थानकावरील तिकीट मशीनच्या माध्यमातून ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बहुउद्देशीय स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले असून आता मेट्रो प्रशासनाने मासिक पास बरोबरच दैनंदिन पासची सुविधा सुरू केली आहे. प्रवाशांना शंभर रुपयांना दैनंदिन पास काढता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा आर्थिक फायदा तसेच वेळ वाचणार आहे.
मेट्रो प्रशासनाने दैनंदिन पासची सुविधा उपब्ध करून दिली आहे. शंभर रुपयांतील हा पास मेट्रोच्या दोन्ही मार्गावर वापर करता येणार आहे. ज्या दिवसाचा पास आहे, त्या दिवशी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत या पासची वैधता असणार आहे. हा पास काढल्यानंतर दोन्ही मार्गावरून प्रवासाची मुभा आहे. तसेच हा पास दिवसभर वापरता येणार असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आपली कामे होईपर्यंत मेट्रोच्या दोन्ही मार्गावर प्रवास करून परत येता येणार आहे.












