न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०१९) :- मावळ व शिरूर लोकसभेची निवडणूक प्रक्रिया सोमवार (दि. ३० एप्रिल) रोजी पार पडली. या निवडणुकीत पुणे लोकसभा मतदार संघाप्रमाणेच सर्वात कमी मतदान मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात होईल, असा कयास वर्तविला जात होता. यात राजकीय व सामाजिक माध्यमेही आघाडीवर होती. मात्र, मावळ व शिरूर लोकसभेत काल झालेल्या निवडणुकीत वेगळीच आकडेवारी समोर आली व एकदाचे उमेदवारांनी हुश्श केले.
मावळ लोकसभा मतदार संघातून एकूण ५९.४९ टक्के मतदान झाले तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून ५९.४६ टक्के मतदान झाले आहे. गतवर्षी मावळ लोकसभा मतदारसंघात ६०.५४ टक्के मतदान झाले होते. तर शिरूर मतदारसंघात ५९.७७ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ १.५ टक्के मतदान मावळातून घटले आहेत. तर शिरूरमधून ०.३१ टक्के मतदान घटले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारसंख्या २२,९७,४०५ एवढी होती. त्यात १३,६६,८१८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभानिहाय मतदान पहिले तर पनवेल मधून ५५.३३ टक्के, कर्जतमधून ६७.७६ टक्के, उरणमधून ६७.२१ टक्के, मावळमधून ६२.६० टक्के, चिंचवडमधून ५६.२९ टक्के तर पिंपरीतून ५४.४६ टक्के मतदान झाले आहे.
तसेच शिरूर मतदारसंघात एकूण मतदारसंख्या २१,७३,४८४ एवढी होती. त्यात १२,९२,३८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. विधानसभानिहाय मतदान पहिले तर जुन्नरमधून ६४.९० टक्के, आंबेगावमधून ७०.२९ टक्के, खेडमधून ६२.७६ टक्के, शिरूरमधून ६१.५२ टक्के, भोसरीतून ५७.४८ टक्के, हडपसरमधून सर्वात कमी म्हणजेच ४७.८४ टक्के मतदान झाले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार तर शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात खरी लढत आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे तर शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात खरी लढाई होणार आहे.
मावळ मतदारसंघात मतदानाची टक्केवारी पहिली असता घाटाखाली पनवेल, कर्जत, उरण या परिसरात सर्वाधिक मतदान झाले आहे. त्याखालोखाल मावळ, चिंचवड, पिंपरी मतदार संघात मतदान झाले आहे. घाटाखाली शेकापची ताकद मोठी आहे. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी शेकापने मागणी लावून धरली होती. त्यामुळे घाटाखालचे मतदान निर्णायक भूमिका बजावणार यात शंका नसावी.
शिरूरमधून आंबेगाव, जुन्नर, खेड या भागात मतदानाची टक्केवारी चांगली आहे. विशेष म्हणजे आंबेगावमधून सर्वाधिक मतदान झाले आहे. तसे पाहता आंबेगाव हा परिसर खा. आढळराव यांचा बालेकिल्ला मानला जातो. डॉ. अमोल कोल्हे यांची जन्मभूमी जुन्नरमधूनही मतदानाचा जोर पहावयास मिळाला आहे. शिरूर व भोसरी तसेच हडपसर मतदार संघातून मात्र मतदानाची टक्केवारी निर्णायक ठरणार आहे.















