न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२४) :- शिवसेना पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती मावळ लोकसभा मतदारसंघात वाघेरेंना ‘कॅश करता आली नाही. शिवाय नव्या चिन्हावर लढणाऱ्या वाघेरेंना ‘मशाल’ मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले. तेथेच त्यांचा पराभव झाला. संजोग वाघेरे हे खरंतर पिंपरी चिंचवडचे. त्यातही ते पिंपरी विधानसभा क्षेत्रातील पिंपरीगावात राहणारे. इथून त्यांना पन्नास हजारांपेक्षा जास्तीचे मताधिक्क्य मिळेल, अशा भ्रमात ते होते. स्वतःचं होम ग्राउंड, राष्ट्रवादी पवार गटाची ताकद व राष्ट्रवादीतील (अजित पवार) जुन्या मित्रांनी मागून केलेली हातमिळवणी, अशा अनेक कारणांमुळे संजोग वाघेरे गाफील राहिले.
श्रीरंग बारणे यांना पिंपरी विधानसभा मतदार संघातून गत निवडणुकीत चाळीस हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्क्य होतं. यावेळी ते तसेच राहील, अशी त्यांची अपेक्षा होती. पण तसेही घडले नाही. पिंपरी विधानसभेतून तब्बल १७,००० पेक्षा अधिकचं मताधिक्क्य मतदारांनी श्रीरंग बारणे यांच्या पारड्यात टाकलं. पिंपरी मतदारसंघात राजकीयदृष्ट्या सतरा हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्क्य मिळणं, ही खूप मोठी गोष्ट आहे.
भाजपचे पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे हे पिंपरी विधानसभेचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप व आ. उमा खापरे यांच्यासोबत पिंपरी विधानसभेत ३९९ बूथप्रमुख व १३५ वॉरियर यांच्या माध्यमातून मतदारसंघात जोर बैठक घेतल्या होत्या. त्याचा मतदानावर मोठा परिणाम झाल्याचे दिसते. तसेच भाजपचे माजी नगरसेवक शितल शिंदे, युवा मोर्चाचे अनुप मोरे, राजेंद्र बाबर, शैलेश मोरे, सुजाता पलांडे, सुप्रिया चांदगुडे, संदीप वाघेरे, कुणाल लांडगे या सर्वांनी प्रचारात आघाडी घेत मोठी ताकद श्रीरंग बारणे यांच्या मागे उभी केल्याचा परिणाम दिसत होते.
मागील निवडणुकीत माजी आमदार गौतम चाबुस्कवार हेही बारणे यांच्याबरोबर नव्हते. यावेळी ते ठाकरेंच्या शिवसेनेसह श्रीरंग बारणे यांच्या विरोधातच होते. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा धर आणि त्यांच्या टीमने परिसर पिंजून काढून देखील त्यांना निवडणुकीत प्रभाव पाडता आलेला नाही? असे आकडेवारी सांगते. शिवसेनेचे कार्यकर्ते या भागात तसे कमीच. परंतु, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, जितेंद्र ननावरे यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली होती. दरम्यान राष्ट्रवादीतील काही तुरळक नेते वगळता कुणीही या मतदारसंघात प्रबळ काम करताना निदर्शनास आले नाही. येथील स्थानिक आमदार अण्णा बनसोडे प्रचारात कुठेच दिसले नाहीत. अगदी शेवटच्या दिवशी गाडीतून हात उंचावताना ते दिसले, एवढेच काय ते त्यांचे काम. त्यांनी मनापासून ग्राउंडवर उतरून काम केलेच नाही, हे सर्वांना दिसून आलं. त्यामुळे खा. बारणे यांना त्यांचा निवडणुकीत किती फायदा झाला? हा संशोधनाचा विषय. राष्ट्रवादीचे नारायण बहिरवाडे, शाम लांडे, विशाल काळभोर, योगेश बहल, जगदीश शेट्टी आदी मंडळी वगळता कोणीही प्रचारात दिसतं नव्हतं.
पिंपरी विधानसभेत भाजपची व्युव्हरचना आणि बूथ लेवलने बजावलेली चोख कामगिरी श्रीरंग बारणे यांना ऐनवेळी तारून नेणारी ठरली. आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिंदे गटाचे पिंपरी विधानसभेत पारडे जड झाल्याचे हे द्योतकच म्हणावे लागेल.

















