- बांधकाम व्यावसायिकाकडून दोन कोटीची नुकसान भरपाई त्वरीत घ्या..
- आपचे रविराज काळे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- पिंपरी महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाने नागरिकांना चालण्यासाठी मातीचे इको जॉगिंग ट्रॅक शहरातील विविध ठिकाणी तयार केले आहेत. यामध्ये नाशिक फाटा ते लांडेवाडीपर्यंत लाखो रुपये खर्च करुन सहा मीटर रुंद आणि एक हजार दोनशे मीटर लांबीच्या जॉगिंग ट्रॅक तयार केला. परंतू, नाशिक फाटा येथे गेरा इम्पेरियल गेटवे गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांची बांधकाम साईट सुरु आहे. त्यांचे भोसरी येथून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. ही भूमिगत केबल टाकताना महापालिकेने लाखो रुपये खर्च करुन तयार केलेला इको जॉगिंग ट्रॅकवर खोदाई केली आहे. त्यामुळे सगळ्या ‘इको जॉगिंग ट्रॅक’ची बिल्डरने वाट लावली आहे. संबंधित बिल्डरने विनापरवानगी खोदाई केली असून त्यांनी इको जॉगिंग ट्रॅकवर खोदाई केल्याने मनपाचे दोन कोटींचे नुकसान झाले आहे.
महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाने इको जॉगिंग ट्रॅक उभारल्यानंतर या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ सुरू झाली. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर आळा बसला आहे. हा जॉगिंग ट्रॅक नैसर्गिक पद्धतीने उभारण्यात आला आहे. महापालिकेने नाशिक फाटा ते लांडेवाडी पर्यंत इको जॉगिंग ट्रॅकवर लाखो रुपये खर्च केले आहे. पण, गेरा इम्पेरियल गेटवे गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. यांचे नाशिक फाटा या ठिकाणी बांधकाम साईटचे काम सुरु आहे. त्या बांधकाम साईटकरिता अतिरिक्त विद्युत पुरवठा हवा असल्याने भोसरी येथून २२ केवी व्हॅटची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यात येत आहे. मूळात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम करताना नाशिक फाटा ते भोसरी अशी खोदाई केलेली दिसत आहे. मात्र, महापालिकेच्या इको जॉगिंग ट्रॅकसाठी लाखो रुपये खर्च करुन तयार केला आहे. त्या इको जॉगिंग ट्रॅकलगत मोठी चर खोदून त्या ट्रॅकची संपुर्ण वाट लावली आहे.
दरम्यान, संबंधित बिल्डरने महापालिकेच्या स्थापत्य उद्यान आणि स्थापत्य विभागाची खोदाई परवानगी घेतली आहे का?, नागरिकांना चालण्यासाठी तयार केलेला इको जॉगिंग ट्रॅक देखील खोदाई करुन खराब केला आहे. एका बांधकाम व्यावसायिक एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियम पायदळी तुडवत असताना पिंपरी मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये पथ विभाग, उद्यान विभाग यांनी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी याकडे दुर्लक्ष केले का याची चौकशी करावी. झालेले दोन कोटींची नुकसान भरपाई त्वरीत करून घ्यावी. शहरात गेरा इम्पेरियल गेटवे गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या साईट जिथे असतील तेथील विद्युत केबल विनापरवाना टाकली का? याची चौकशी करावी. ही चौकशी होईपर्यंत सर्व कामांना स्थगितीचे आदेश द्यावेत. संबंधित बिल्डरसह पालिकेच्या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी आपचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.


















