न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२४) :- बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबधित विभागातील कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी येथील महापालिका मुख्य कार्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, ज्ञानदेव जुंधारे, बाबासाहेब गलबले, उप आयुक्त संदिप खोत, अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, कार्यकारी अभियंता शशिकांत मोरे, रामनाथ टकले, देवण्णा गट्टूवार, अनिल राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे, किरण पठारे तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये इरशाद कुरेशी, मुबीन कुरेशी, शब्दुल्ला काजी, नियाज देसाई, रौफ कुरेशी, नादिर बैग, गफुर कुरेशी आदींचा सहभाग होता.
बकरी ईदसाठी महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपातील पत्राशेड आणि मंडप उभारण्यात येणार आहे. कुर्बानीच्या ठिकाणी आवश्यक साहित्य, मोबाईल टॉयलेट व्हॅन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी आणण्यात आलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी पुरेशा जागेची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
बकरी ईदसाठी आवश्यक पाण्याचा पुरवठ्यासाठी पाण्याचे टँकर आणि स्वतंत्र हौद उभारण्यात येत आहे. कुर्बानीनंतर निर्माण होणारे वेस्ट तात्काळ उचलण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच विद्युत पुरवठा आणि जनरेटरची सुविधाही देण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणाही
बसविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी दिली.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी पाण्याचा पुरवठा अधिक प्रमाणात करण्यात यावा, गुरे बांधण्यासाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी, मंडपाच्या किंवा पत्राशेडच्या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी, बकरी ईदसाठी मुस्लिम बांधवांना कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी तसेच कुर्बानीसाठी ४ दिवसांची मुदत द्यावी आदी मागण्या यावेळी बैठकीत उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आल्या.